शिक्रापूर – पुणे-नगर महामार्गावर कासारी फाटा (ता. शिरूर) येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका महिला पोलीस निरीक्षकासह पाचजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती चंद्रकांत गडकरी (वय 42 रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक, ता. हवेली), लक्ष्मण शालींग नाईक (वय 23, रा. घाटनांदुर, जि. बीड) तर टेम्पोमधील रुक्मिणीबाई क्षीरसागर, ओम माळवदकर, श्रावणी माळवदकर (सर्व रा. परळी, जि. बीड) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. कृष्णा लक्ष्मण कंकाळ (रा. नायगाव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
ज्योती गडकरी यांनी फिर्याद दिली आहे.
अहमदनगर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या कारमधून पुण्याकडे जात होत्या. गडकरी कासारी फाट्याजवळ आल्यानंतर पाठीमागून आलेल्या टेम्पोची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे गडकरी यांची कार समोरून चाललेल्या टेम्पोवर आदळली. त्यामुळे दोन्ही गाडीतील पाच जण जखमी झाले आहेत. कार तसेच टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, महिला पोलीस ज्योती आहेरकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलविले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करीत आहेत.