भोर – भोर तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव विसरून गणेश भक्तांनी भोरच्या बाजारपेठेत गणेशोत्सव उत्साहात साकारण्याचा चंग केल्याचे निदर्शनास आले. ढोल-ताशांच्या निनादाशिवाय गणरायाचे आगमन झाले; पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात तोबा गर्दी झाली होती.
यावर्षी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाने आवाहन केल्यामुळे शहर व तालुक्यातील गणेश मंडळांनी ढोल-ताशांचा गाजावाजा न करता श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली. सरकारच्या नियमांनुसार भाविकांनी छोट्या मूर्तींनाच पसंती दिली; परंतु छोट्या मूर्तीं व सजावटीच्या साहित्याच्या किमतीत मागील वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
गौरी-गणेशाच्या मूर्ती आणि पूजा साहित्य खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन कोणीही केले नसल्याने उपक्रमाचा पुरता फज्जा उडाला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यातील 91 गावांत “एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवण्यात आली आहे. 63 गावांत काही मंडळांनी, तर घरोघरी शांततेत सोशल डिस्टन्स पाळून श्री गणेशाचे स्वागत करून प्राणप्रतिष्ठापना केली आहे.
शहरात तसेच ग्रामीण भागात “नियम पाळा, करोना टाळा’, गर्दी हटवा, सॅनिटायझरचा वापर कसा करावा, असे जनजागृती करणारे फलक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून झळकवले गेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात कृती वेगळीच दिसत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.