पुणे-सोलापूर महामार्गावर यवत येथील घटना
यवत (वार्ताहर) – पुणे-सोलापूर महामार्गावर यवत गावच्या हद्दीत औषधं वाहतूक करणारा कंटेनर चालकाला जीवे मारण्याची धमकी देत कंटेनरमध्ये 5 कोटी 93 लाख 21 हजार 885 रुपयांची औषधे लंपास केली. याप्रकरणी कंटेनर चालक काळूराम नथुराम नाईक (वय 42, रा. ठाणे) यांनी फिर्याद दिली असून यवत पोलीस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कंटेनर चालक काळूराम नाईक हे कंटेनर (एमएच 04 एचवाय 5238) मधून नोव्हर्टीज हेल्थ केअर प्रा. लि. भिवंडी, ठाणे येथून औषधे भरून हैदराबादला जात होते. दरम्यान, आज (दि.7) पहाटे 3:40 च्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील जावजीबुवाचीवाडी गावच्या हद्दीत आला असता पाठीमागून आलेल्या ट्रकमधील चार अज्ञात आरोपींनी ट्रक आडवा लावून कंटेनर थांबवला. त्यानंतर चालकाला मारहाण करत त्याला अज्ञात स्थळी सोडले.
कंटेनर चालकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी चालकाची सुटका केली. त्यानंतर चालकाने यवत पोलीस ठाण्यातून आपल्या कंपनीत संपर्क साधला. कंटेनरला जीपीआरएस असल्यामुळे शोध घेतला असता कंटेनर पुणे-सोलापूर महामार्गावरील अन्नपूर्णा हॉटेलसमोर उभा असलेला दिसला. घटनास्थळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पाहणी करीत आरोपी पकडण्याबाबत सूचना केल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.