मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोशल मीडियावर कार्टून फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मुंबईत घडली. मदन शर्मा असे माजी नौदल अधिकाऱ्याचे नाव असून या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अत्यंत वाईट आणि धक्कादायक घटना आहे. माजी नौदल अधिकाऱ्याला केवळ व्हॉट्सअॅप फॉरवर्ड केल्याने गुंडानी मारहाण केली. कृपया हा गुंडाराज थांबवा,अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. तसेच या गुंडाविरोधात कठोर कारवाई करण्याची आणि शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, “मी फक्त व्हॉट्सअॅपवर एक कार्टून फॉरवर्ड केले होते. हीच माझी चूक होती. मला काहीच न बोलता थेट घरात घुसून मला मारहाण करण्यास सुरू केली. तसंच त्यानंतर पोलीसही मला अटक करायला आले, असा आरोप निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी केला. याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या मदतीमुळे माझी अटक टळली,” असेही शर्मा यांनी म्हटले आहे.