मुंबई – करोनाच्या ब्रिटनमधील नव्या स्वरूपामुळे सोमवारी ( stock market news today ) शेअर बाजाराचे निर्देशांक 3 टक्क्यांनी कोसळले होते. दरम्यानच्या काळात अमेरिकन संसदेने 900 अब्ज डॉलरचे पॅकेज जाहीर केले आहे. त्याचबरोबर स्थूल भारतीय अर्थव्यवस्था मजबुत असल्यामुळे सोमवारी निर्देशांकाचा झालेला घसारा तीन दिवसात भरून निघाला.
गेल्या तीन दिवसात शेअर बाजार निर्देशांकात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( bombay stock market ) सेन्सेक्स पुन्हा 47 हजारांच्या जवळ गेला आहे. आज काही काळ सेन्सेक्स 47 हजाराच्या पुढे गेला होता. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 529 अंकांनी म्हणजे 1.14 टक्क्यांनी वाढून 46,973 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंकांनी वाढून 13,749 अंकावर बंद झाला.
एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे मुख्य निर्देशांकाने चांगला आधार मिळाला. ऍक्सिस बॅंक, सनफार्मा, कोटक बॅंक, एअरटेल या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घसघशीत वाढ झाली. मात्र इंडसइंड बॅंक, नेस्ले, टेक महिंद्रा या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुरुवारी जास्त खरेदी झाल्याचे दिसून आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र वगळता इतर क्षेत्राचे निर्देशांक वाढले.
ब्रेक्झिट व्यापार करार होण्याची शक्यता असल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. ब्रिटनमधील नव्या करोना व्हायरसचा प्रभाव कमी दिसून येत आहे. काही देशांनी ब्रिटन बरोबरची वाहतूक सुरू केली आहे. याचा जागतिक शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्था गुंतवणुकदारांची खरेदी चालूच आहे. तुलनेने डॉलर कमकुवत असल्यामुळे व विकसित देशात भांडवल सुलभता असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराकडे त्यातील गुंतवणूक वाढत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी 536 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.