पुणे – मुलीचे अपहरण करून तिला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध करून बलात्कार केला. 21 डिसेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास वडगावशेरी परिसरातून मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर तिला नेवासा (नगर) परिसरात नेऊन बलात्कार केला.
सागर मोहन सातव (वय 28, रा. सातव वस्ती, वाघोली) याच्यासह त्याच्या दोन साथीदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. फिर्यादी तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील एका तरुणाशी मैत्री होती.
21 डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास तरुणी रस्त्याने एकटी जात असताना सागर दोन साथीदारांसह मोटारीतून तेथे आला. त्याने तरुणीला अडवून “मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बसली नाही तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईल’, असे म्हणत त्याने विषारी औषधाची बाटली तरुणीला दाखवली.
त्यामुळे घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीच्या औषधाने अर्धवट बेशुद्ध केले. तिचे हातपाय बांधून नेवासा येथे (नगरला) नेले. त्याठिकाणी तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिघांनी तिला पुन्हा गाडीतून पुण्यात आणून सोडून दिले. या घटनेने तरुणीला धक्का बसला आहे. चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.