पुणे – स्ट्रॉबेरी आणि नाताळ सणाचे वेगळ समीकरण आहे. नाताळाची चाहुल लागताच स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होते. तिला राज्यासह पराज्यातून मोठी मागणी असते.
स्ट्रॉबेरी उत्पादनाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर, वाई, पाचगणी भागात अवेळी झालेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. ऐन नाताळात बाजारात स्ट्रॉबेरीचा तुटवडा जाणवत असून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, विक्रेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
थंडी सुरू झाली की स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होते. यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस सुरू होता.
महाबळेश्वर, पाचगणी, वाई भागातील वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक आहे. देशाच्या कोणत्याही भागात महाबळेश्वर एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात नाही. अवेळी झालेल्या पावसामुळे यंदा उत्पादनावर परिणाम झाला असून, नाताळात स्ट्रॉबेरीचा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.