मुंबई – अमेरिकेने व्याजदरात विक्रमी वाढ केल्यानंतर जगभर जागतिक मंदीच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अमेरिकेसह इतर देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर चालूच असून शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पाव टक्क्यांनी कमी झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 135 अंकांनी कमी होऊन 51,360 अंकांवर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 574 अंकांनी कमी होऊन एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 67 अंकांनी म्हणजे 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 15,293 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारातील आजच्या कामकाजाचे वैशिष्टय म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून अपेक्षेप्रमाणे विक्री वाढली आहे. या गुंतवणूकदारांनी काल 3,257 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. अमेरिकेत व्याजदर वाढून डॉलर बळकट होत असल्यामुळे रुपयाच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक या गुंतवणूकदारांना तोटादायक ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे गुंतवणूकदार अमेरिकेतील कर्जरोखे किंवा अमेरिकेतील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता वाढली आहे.
या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक कायम ठेवण्यासाठी रुपया मजबूत होण्याची गरज आहे. अन्यथा हे गुंतवणूकदार आणखी विक्री करून परत जाण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की, अमेरिकेनंतर इतर देशातील रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवर मंदीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
कोणत्या कंपन्यांचे शेअर घसरले –
टायटन, विप्रो, डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट्स, सनफार्मा, पावर ग्रिड, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. तर बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.