मुंबई- ग्राहकोपयोगी वस्तूंचे भाव वाढत असतानाच या क्षेत्रातील आयटीसी कंपनीच्या शेअरचा भाव मार्च महिन्यामध्ये 17 टक्क्यांनी वाढला आहे. आयटीसी कंपनीच्या स्पर्धक कंपन्यांच्या शेअरच्या भावात मात्र नफा कमी होण्याच्या शक्यतेमुळे मार्च महिन्यामध्ये घट नोंदली गेली आहे.
गोदरेज कंझ्युमर कंपनीच्या शेअरचा भाव मार्च महिन्यात आठ टक्क्यांनी कमी झाला. नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी, हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या शेअरचा भाव आठ टक्क्यानी, डाबर इंडिया कंपनीच्या शेअरचा भाव 7.6 टक्क्यांनी, मारीको कंपनीच्या शेअरचा भाव 5.4 टक्क्यांनी कमी झाला आहे.
विशेष म्हणजे गोदरेज कंझ्युमर, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरच्या भावात सलग तिसऱ्या महिन्यात घट झाली आहे. डाबर इंडियाच्या शेअरचा भाव चार महिन्यापासून कमी होत आहे. तर मारिको कंपनीच्या शेअरचा भाव पाच महिन्यापासून कमी होत आहे. विश्लेषकांनी सांगितले की युद्ध सुरू झाल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळे या कंपन्यांच्या विक्रीत घट होण्याची शक्यता असल्यामुळे शेअरचे भाव कमी होत आहेत.
ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला असल्यामुळे ग्राहकाकडून खरेदी कमी होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. आयटीसीची उत्पादने खाद्यपदार्थावर आधारित आहेत. खाद्यपदार्थाच्या विक्रीत घट होण्याची शक्यता कमी असल्यामुळे आयटीसी कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून येते.
आयटीसी कंपनी सिग्रेटचे उत्पादन करते. अर्थसंकल्पामध्ये सिगरेटवरील करात वाढ न केल्यामुळे आयटीसी कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. आयटीसी गव्हाची निर्यात करण्याची शक्यता आहे. कारण रशिया- युक्रेनद्वारा होणारी निर्यात कमी होणार आहे. हे दोन्ही देश मिळून जागतिक बाजारपेठेत 30 टक्के इतक्या गव्हाची निर्यात करतत. करोनावरील निर्बंध संपुष्टात येत असल्यामुळे आयटीसीच्या हॉटेलमधील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.