मुंबई – शेअर बाजार निर्देशांक ( Stock market index ) उच्च पातळीवर असल्यामुळे काल खरेदी-विक्रीच्या लाटा येऊन निर्देशांक स्थिर राहिले होते. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मात्र बरीच खरेदी झाल्यामुळे निर्देशांक उंचावले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ( National Stock Exchange Index ) निफ्टी गेल्या आठवड्यात 14,000 अंकांना स्पर्श करून परत जात होता. आज मात्र निफ्टी 14,000 अंकाच्या वर बंद झाला. मोठ्या कंपन्यांचे शेअर महाग झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता आपला मोर्चा छोट्या कंपन्यांच्या शेअरकडे वळविला आहे. शुक्रवारी मिडकॅप आणि स्मॉलकॅप जवळजवळ एक टक्क्यानी वाढले
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( Mumbai Stock Exchange Index ) सेन्सेक्स 0.25 टक्क्यांनी ( Sensex )म्हणजे 117 अंकांनी वाढून 47,868 अंकांवर बंद झाला. एक वेळ हा निर्देशांक 48 हजार अंकाच्या जवळ गेला होता. बाजार बंद होताना निफ्टी 36 अंकांनी वाढून 14,018 अंकांवर बंद झाला.
आयटीसी, स्टेट बॅंक, महिंद्रा कंपन्यांचे शेअर मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला. राष्ट्रीय शेअर बाजारातील बॅंका आणि वित्तीय संस्था ही क्षेत्रे वगळता इतर क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ झाली. वाहन कंपन्यांनी आज डिसेंबरच्या विक्रीची आकडेवारी जाहीर केली. ती समाधानकारक असल्यामुळे वाहन कंपन्यांच्या शेअरची बऱ्याच प्रमाणात खरेदी झाली असल्याचे दिसून आले.
निर्देशांक उच्च पातळीवर असूनही खरेदी होत असल्याबद्दल एलकेपी सिक्युरिटीजचे विश्लेषक एस रंगनाथन यांनी सांगितले की, वाहन कंपन्यांची विक्री वाढण्याबरोबरच डिसेंबरमध्ये जीएसटी संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदार आशावादी झाले आहेत.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, जीएसटी संकलन आणि वाहन विक्री बरोबरच कंपन्यांचे ताळेबंद नफादायक राहतील याबद्दल गुंतवणूकदारांना खात्री आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत परदेशी गुंतवणूक चालूच राहण्याची शक्यता असल्यामुळे निर्देशांक कमी होणार नाहीत असे गुंतवणूकदारांना वाटते.