पुणे – राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) रिक्त जागांसाठी दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
1 जानेवारीपासून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी 4 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
राज्यातील शासकीय व खासगी “आयटीआय’मधील प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर समुपदेशन फेरी सुरू असून ती गुरुवारी (दि. 31) संपली.
याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी म्हणून शुक्रवारपासून (1 जानेवारी) विशेष फेरीचे आयोजन केले आहे.