पंढरपूर : यंदाच्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी भरभरून दान दिल्याचे समोर आले आहे. भाविकांच्या या दानशूरतेमुळे समितीचे उत्पन्न चौपट वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4 कोटी 88 लाख 62 हजार 28 रुपयांचे दान मिळाले आहे. यामध्ये सोने, रोख देणगी पावती, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी माघीसाठी विक्रमी संख्येने वारकरी आले होते. सुमारे पाच लाख भाविकांनी श्रींचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतल्याची नोंद मंदिर समितीकडे झाली आहे. भाविक संख्या वाढल्याने मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या माघी काळात वसंतपंचमी दिवशी एका भाविकाने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर जवळपास पावणेदोन कोटी रुपयाचे सोन्या चांदीचे दान दिल्याने या उत्पन्नात फार मोठी वाढ झाली आहे.
यंदाची माघ शुद्ध जया एकादशी 1 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. यात्रा कालावधी 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी असा होता. या काळात मंदिर समितीला प्राप्त झालेल्या उत्पन्नाची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा माघी यात्रा काळात मंदिर समितीचे उत्पन्न मागील वर्षी झालेल्या माघी यात्रेच्या तुलनेत जवळपास चौपट झाले आहे.
यंदा माघी एकादशीला पंढरीत मोठ्या संख्येने वारकरी आले होते. यंदाच्या कार्तिकी यात्रेहून अधिक विक्रमी माघी यात्रा झाल्याचे दिसून आले. एकादशीच्या दिवशी सुमारे पाच लाख वारकरी पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आले होते. तर यात्रा काळात सुमारे 8 लाखांहून अधिक वारकरी पंढरीत येऊन गेले आहेत. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पन्न भरघोस वाढले आहे. विशेष म्हणजे यंदा सोन्याच्या स्वरुपात तब्बल 1 कोटी 59 लाख 90 हजार रुपयांचे दागिने आले आहेत. 6 लाख 71 हजार रुपयांचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत.