पुणे : येत्या सोमवारी ( दि.२५) धुळवडीच्या दिवशी मेट्रोकडून मेट्रोत रंग तसेच धुळवड खेळली गेल्यास मेट्रो अस्वच्छ होण्याची भिती असल्याने या दिवशी पुणे मेट्रोची प्रवासी सेवा दुपारी २:०० ते रात्री १०:०० या वेळेत उपलब्ध असणार असून सकाळच्या सत्रात मेट्रो बंद राहणार असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे. मेट्रोची दैनंदिन सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत असते. (Pune Metro services to remain closed till noon on Monday)
शहरात मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी केली जाते. सकाळपासूनच पाणी तसेच रंग खेळले जातात. त्यामुळे अनेकांकडून मेट्रोत सोशल मिडीयावर रिल करण्यासाठी मेट्रोच्या आत पाणी तसेच रंग खेळले जाण्याची भिती आहे. पुण्यात विशेषत: सकाळ पासून दुपार पर्यंंत धुळवड साजरी केली जाते.
त्यामुळे महामेट्रोची स्थानके तसेच डब्यांमध्ये रंग अथवा पाणी खेळले गेल्यास कोच अस्वच्छ होण्याची भिती असल्याने महामेट्रोकडून सकाळी ६ ते दुपारी दोन पर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवली जाणार आहे. सर्व मार्गांवर ही सेवा बंद राहणार असून पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे.