पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड ते नगर रस्त्यापर्यंत प्रवासासाठी तब्बल दीड तास लागणारा वेळ आता अवघ्या २० ते २२ मिनिटांवर येणार आहे. पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्ग येत्या ६ मार्च रोजी सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन या मार्गाला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
पुण्यासह आग्रा, दिल्लीच्या मेट्रोच्या विस्तारीत मार्गांची सेवाही याच वेळी सुरू केली जाणार आहे. दरम्यान, वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग २ आता पूर्ण क्षमतेने पुणे्रांच्या सेवेत असणार आहे. या मार्गाला नुकतीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतरही हा मार्ग सुरू होत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून हा मार्ग सुरू करण्यासाठी आंदोलने केली जात होती.
या मार्गातील पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय असा ५ किलोमीटरचा मार्ग पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते रूबी हाॅल या मार्गावर १ आॅगस्ट २०२३ पासून विस्तारीत सेवा सुरू करण्यात आली तर आता पुन्हा ६ मार्च २०२४ रोजी रूबी हाॅल ते रामवाडी मार्गाची सेवा सुरू केली जाणार आहे. दोन वर्षांत १५ किलोमीटरचा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे शहराचा पश्चिम भाग मेट्रोने पूर्वोत्तर भागाला जोडला थेट जोडला जाणार आहे.
येरवडा स्थानक उशिरा सुरू होणार
वनाज ते रामवडी या १५ कि.मी. मार्ग असून या मार्गात १५ स्थानके आहेत. या विस्तारित मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ कि.मी. आहे. मार्गावरील येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने हे स्थानक उशिरा सुरू केले जाणार आहे.