पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत असले, तरी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीनही दिवशी शासकीय सुट्टी आली आहे. त्यामुळे गुरुवारीच बिलांची कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी पालिकेतच मुक्काम ठोकला.
महापालिकेने मागील वर्षापासून निविदा तसेच बिलांसाठी “आयडब्लूएमएस’ प्रणाली विकसित केली आहे. पण, या प्रणालीत अचानक बिघाड झाल्याने पहाटे ३ वाजेपर्यंत ठेकेदार आणि कर्मचारी प्रशरासकीय इमारतीतच होते. महापालिकेत आतापर्यंत ३१ मार्चचे काम रात्री १२ पर्यंत सुरू राहत असे. मात्र, पहिल्यांदाच इतक्या उशिरापर्यंत हे कामकाज सुरू राहिले. महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक दि. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीचे असते.
दरवर्षी पूर्ण झालेल्या विकासकामांची बिले ३१ मार्चपूर्वी सादर झाल्यानंतर दिली जातात. या मुदतीनंतर आल्यास ती पुढील वर्षात दिली जातात. या कामात सूसुत्रता येण्यासाठी प्रशासनाकडून एकात्मिक कामकाज नियंत्रण प्रणाली ( IWMS) विकसित केली आहे. या अंतर्गतच कामांच्या निविदा प्रक्रिय, बिले तयार करणे ही कामे केली जातात.
तसेच सादर करण्यात आलेली बिलेही याच प्रणालीमधून स्वीकारली जातात. तसेच जी.आय.एस. मॅपिंग, प्रशासकीय मान्यता, लाॅकिंग, तांत्रिक मान्यता, डीटीपी, निविदा जाहिरात, ऑडिट व दक्षता विभागासाठी तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट, निविदा मान्यतेचे डॉकेट, कार्यादेश (वर्क ऑर्डर) आणि मोजमापक पुस्तके इत्यादी कामेही केली जातात.
मात्र, या संगणक प्रणालीत गुरूवारी बिघाड झाला. त्यातच वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने कामकाज ठप्प झाले. या शिवाय, प्रणालीत बिलांच्या नोंदीबाबत अनेक त्रुटी समोर आल्याने पहाटेपर्यंत हे कामकाज सुरू होते.
सलग सुट्टीचा फटका
महापालिकेचे आर्थिक वर्ष रविवार ३१ मार्चला संपत आहे. परंतु, गुड फ्रायडे आणि शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्ट्या आल्या. त्यामुळे गुरुवारी महापालिकेमध्ये कामांच्या बिलांसाठी ठेकेदारांनी गर्दी केली. मात्र, संगणक प्रणालीत बिघाडाने वेळ जात होता. त्यामुळे या कामांसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली जात होती. मात्र, लोकसभा आचारसंहितेचे कारण देत सायंकाळी उशिरापर्यंत महापालिकेने तसा निर्णय घेतला नाही. तर, प्रशासनाने रात्री १२ वाजेपर्यंत बिल जमा करून घेतली.