श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नागवडे कुटुंबामध्ये मध्यस्थी चुकीचा असल्याने जवळीक होत नव्हती. मात्र, आता पवारांना वस्तुस्थिती समजली असून नागवडे कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या रूपाने आमच्या पाठीशी राज्यातील बापमाणूस असून गेल्या काळात आमच्यावर अन्याय करणाऱ्या सगळ्यांचा हिशोब चुकता करू, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या(अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब नाहाटा, महिला जिल्हाध्यक्षपदी अनुराधा नागवडे यांची तर राज्य पणन संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय पानसरे यांच्या निवडी झाल्याबद्दल तालुक्यातील ढोकराई फाटा येथील प्रगती मंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांता लबडे होते.
अनुराधा नागवडे म्हणाल्या, स्व. शिवाजीराव नागवडे व राजेंद्र नागवडे यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही. नागवडेंना संपवण्यासाठी अनेकजण झटत आहेत. मात्र, आता आम्हीही मागे हटणार नसून आरेला कारे करण्याची आमचीही तयारी आहे. अंगावर येणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ज्यांनी ज्यांनी नागवडेंवर अन्याय केला, त्या सगळ्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचा इशारा दिला.
प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत नागवडेंना पाठबळ देण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे अनुराधा नागवडेच विधानसभेच्या उमेदवार असतील. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले, अजित पवार यांचे श्रीगोंद्यावर विशेष प्रेम असून त्यांनी मोठ्या पदांवर श्रीगोंद्यातील नेत्यांना संधी दिली आहे. आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अनुराधा नागवडे यांना आमदार करायचे आहे. दत्तात्रय पानसरे म्हणाले, राजेंद्र नागवडे आणि बाळासाहेब नाहाटा यांच्यामुळे राज्यस्तरीय संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. शेवटच्या श्वासापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजेंद्र नागवडे यांच्याशी एकनिष्ठ राहू, अशी ग्वाही दत्तात्रय पानसरे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे, नागवडे कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाटगे, अनिल पाचपुते, धर्मनाथ काकडे, राकेश पाचपुते, योगेश भोयटे, आदेश नागवडे, बाळासाहेब पठारे, बंडू जगताप, डी. आर. काकडे, लक्ष्मण रायकर, अशोक रोडे, बंडू पंधरकर, भाऊसाहेब नेटके आदी उपस्थित होते.
पानसरेंनी पवारांना बाटलीत घातले
बाळासाहेब नाहाटा म्हणाले, दत्तात्रय पानसरे हे वेगळेच रसायन असून त्यांनी पणन महासंघाच्या निवडणूकीत आमदार, खासदारांसह अजित पवारांना देखील बाटलीत घातले. तर दत्तात्रय पानसरे म्हणाले, अजित पवार हे बाळासाहेब नाहाटा यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. त्यांनी पवारांना काय औषध दिलंय तेच समजत नाही, असे म्हणताच कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.