जम्मू-काश्मीरमधील रिअल इस्टेटची स्थिती (भाग-2)

काश्‍मीरकडे आतापर्यंत आपण पर्यटन म्हणूनच पाहात आलो आहोत; परंतु केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काश्‍मीरकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. केवळ फिरण्यासाठी नाही तर नवीन उद्योग, गृहप्रकल्पाची उभारणी म्हणूनही याकडे पाहावे लागणार आहे. कलम 370 आणि 35 अ काढल्यानंतर रिअल इस्टेट कंपन्यांसाठी तेथे गुंतवणुकीचा पर्याय खुला झाला आहे. रिअल इस्टेटशी निगडीत अनेक मंडळीदेखील काश्‍मीरकडे संधी म्हणून पाहात आहेत.

जम्मू-काश्मीरमधील रिअल इस्टेटची स्थिती (भाग-1)

योग्य मूल्यांकनाचा मुद्दा : श्रीनगरमध्ये 2019 मध्ये मालमत्तेच्या मूल्यांचा ट्रेंड पाहता जम्मूप्रमाणे श्रीनगरच्या मालमत्ता बाजारात वाढ झालेली दिसून येत नाही. तेथील मालमत्तेच्या किमती या स्थिरच राहिल्या आहेत. मध्य काश्‍मीरच्या श्रीनगरमधील हुमहामा परिसरात आदर्श पाम स्प्रिंग निवासी योजनेत रेडी पझेशनचे फ्लॅटची किंमत 65 ते 85 लाख रुपये आहे. श्रीनगरच्या किमती या बंगळुरू किंवा पुण्यासारख्या मोठ्या रिअल इस्टेट बाजाराप्रमाणेच आहेत.

स्वस्त मालमत्ता महागण्याची शक्‍यता : जम्मू-काश्‍मीरच्या ज्या भागात कमी किमतीत मालमत्ता मिळत होती, तेथे दुप्पट दर होण्याची शक्‍यता आहे. उदा. श्रीनगरच्या पंथा चौक भागात सध्या 2300 चौरस फूट दर आहे. अर्थात तेथे लोकेशन अतिशय उत्तम आहे. त्याचवेळी जम्मूच्या सुसज्ज भागातील मालमत्तेच्या बाजारात चांगली वाढ होण्याची शक्‍यता आहे. तेथे सध्या 40 लाख रुपयांत सहजपणे घर मिळते. एका अर्थाने जम्मू-काश्‍मीरच्या तुलनेत अन्य राज्यातील घराच्या किमती अधिक आहेत.

नियम आणि पारदर्शकतेचा अभाव : काश्‍मिरातील मालमत्तेची मूल्यनिश्‍चिती हा सर्वात मोठा मुद्दा आहे. मूल्यनिश्‍चिती हा चिंतेचा विषय नसला तरी खरा मुद्दा हा पारदर्शकता आणि नियमाचा आहे. आतापर्यंत काश्‍मिरातील मालमत्ता बाजार हे मर्यादित, चौकटीत राहिले आहेत. तेथे पारदर्शकता आणि नियमांचा अभाव राहिला आहे. अर्थात, मूल्यांकन यंत्रणा राबविण्याची समस्या असणार आहे. डिजिटायजेशन आणि उपयुक्त सिस्टिम जोपर्यंत रिअल इस्टेटमध्ये लागू होत नाही, तोपर्यंत बाजारात अशांतता राहील.

श्रीनगर-जम्मूतील फरक :
श्रीनगर हे प्रामुख्याने विक्रेत्यांची बाजारपेठ राहिली आहे. तेथे जमीन आणि मालमत्ता यांच्या मालकीच्या कागदपत्रांवरून काही ठिकाणी व्यवहारात अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे जम्मूचा रिअल इस्टेट बाजार हा लहान प्रमाणात असून तेथे स्वतंत्र घराबरोबरच लहान योजनाही कार्यान्वित होत आहेत. या घराची किंमत सध्या 45 ते 55 लाखांच्या आसपास आहे. मात्र, बहुतांश घरे ही मोठ्या आकाराची आहेत. सध्या देशात नव्याने रिअल इस्टेट बाजार सुरू होण्याच्या शक्‍यतेवरून फारसा उत्साह दिसत नाही. कारण अगोदरच भारतातील रिअल इस्टेट मंदीचा सामना करत असून विश्‍वासार्हतेवरूनही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत जम्मू-काश्‍मीरसारख्या संवेदनशील भागात कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करताना गुंतवणूकदार विचार करेल. कारण कोणत्याही भागाचा विकास हा गुंतवणूकदारावर अवलंबून आहे. अशा ठिकाणी राजकीय स्थिरता आणि आर्थिक विकास हे दोन्ही बाजूने मजबूत असतात.

– कमलेश गिरी

Leave A Reply

Your email address will not be published.