रेपो दर कपातीचा दिलासा

आरबीआयने पतधोरणात रेपो दर कपातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे निवासी बाजारात किरकोळ वाढ होण्याची शक्‍यता आहे. या निर्णयामुळे बॅंकिंग सिस्टिमची ग्रोथ होईल आणि त्याचा थेट परिणाम रिअल इस्टेटला मिळेल. अशा स्थितीत घर खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण अगोदरच बॅंकेचे व्याजदर कमी झाले आहेत.

दरवर्षी देशातील उद्योगांसाठी फेस्टिव्ह सिझन हा मोठ्या आकांक्षांनी भरलेला असतो. या काळात ग्राहक नवीन खरेदीच्या मूडमध्ये असतात आणि त्याचा लाभ घेण्यासाठी उद्योजक तयार असतात. अर्थात, या गोष्टीला रिअल इस्टेटदेखील अपवाद नाही. अलीकडेच आरबीआयने रेपो दरामध्ये 0.35 टक्‍क्‍यांनी कपात केली आहे. त्याचा फायदा उत्सवाच्या काळात घरांची मागणी वाढण्यासाठी होईल अशी अपेक्षा रिअल इस्टेट बाळगून आहे. रेपो दर आता 5.40 टक्‍क्‍यांवर आहे. त्यावर रिव्हर्स रेपो दरामध्ये 0.35 टक्‍क्‍यांने घसरण झाली आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे गृहकर्जदाराच्या हप्त्यात घट होईल. यामुळे उत्सवाच्या दिवसात घरांची विक्री वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

मासिक हप्त्यावर परिणाम : जर आपण 20 लाखांचे कर्ज 20 वर्षांसाठी 9.55 टक्‍क्‍याने घेतले असेल तर यापूर्वी आपल्याला 18,708 रुपये हप्ता भरावा लागत होता. आता नव्या बदलामुळे व्याजदर 9.20 टक्के झाल्याने तो हप्ता 18,253 रुपये होईल. त्याचवेळी 30 लाखांच्या गृहकर्जासाठी 28 हजार 62 रुपये हप्ता भरावा लागत होता. तो आता 27 हजार 379 रुपये होईल. यानुसार 50 लाखांच्या कर्जावर 46 हजार 770 हप्ता भरावा लागत होता. आता तो 45, 631 रुपये होईल. रेपो रेट कमी झाल्याने ग्राहकांच्या खिशावरचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु ग्राहकांकडे दोन पर्याय असतात. एक तर हप्ता कमी करणे किंवा कालावधी कमी करणे. हप्ता कमी करण्यापेक्षा कालावधी कमी करणे हे एका अर्थाने हिताचे ठरते.

तज्ज्ञांचे मत : रिअल इस्टेटमध्ये मिड-सेगमेंटमध्ये मागणी वाढल्याने 0.35 टकक्‍यांची कपात खूपच कमी आहे, असे काहीत तज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात त्याचा लाभ हा परवडणाऱ्या घरांच्या योजनेला होणार आहे. दुसरीकडे परवडणाऱ्या घरांच्या मागणीत वाढ होत आहे. आगामी काळात त्याचे सकारात्मक चित्र दिसेल. टियर-2 आणि टियर-3 शहरातील किमती कमी आहेत. त्यामुळे मागणीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. या निर्णयामुळे निवासी सेक्‍टरमध्ये किरकोळ वाढ होण्याची शक्‍यता आहे. बॅंकिंग सिस्टिममधील ग्रोथ देखील होईल. त्याचा थेट परिणाम रिअल इस्टेटवर होईल. अशा स्थितीत घर खरेदीचा हा योग्य काळ आहे. कारण सध्या व्याजदर दहा ते साडेनऊ टक्‍क्‍यांच्या खालीच आहेत.

बॅंकांवर लक्ष राहणार: रेपो दरामध्ये कपात झाल्यानंतर सर्वांच्या नजरा बॅंकांकडे लागल्या आहेत. या दरकपातीचा कितपत लाभ बॅंका ग्राहकांना देतात, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. एसबीआय, एचडीएफसी बॅंकेने व्याजदरात कपात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, रेपो दरामध्ये कपात करूनही काही बॅंका व्याजदरात कपात करत नाहीत आणि त्याचा लाभ ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना दिल्यास रिअल इस्टेटमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम दिसून लागतील. क्रेडाईचे अध्यक्ष सतीश मगर यांच्या मते, दरकपात ही रिअल इस्टेट उद्योगाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. यातून उद्योगावर सकारात्मक परिणाम होईल. दरकपातीचा लाभ हा कर्जदारांना मिळेल. रिअल इस्टेट उद्योगाला रेपो रेटच्या कपातीची प्रतीक्षा होती आणि आता बॅंकांनी व्याजदरात कपात करुन पुढचे पाऊल टाकणे अपेक्षित आहे.

– कीर्ती कदम

Leave A Reply

Your email address will not be published.