पुणे -डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित डेक्कन जिमखाना राज्यस्तरीय 13 वर्षांखालील बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे संघाने, तर मुलांच्या गटात नागपूर संघाने विजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा 70-30 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
सामन्यात पुणे संघाने सुरेख सुरुवात करत मुंबई उपनगर विरुद्ध अशी 19-07 आघाडी घेतली. त्यानंतर मध्यांतरास पुणे संघाने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत मुंबई उपनगर विरुद्ध अशी 32-13 अशी 19 गुणांच्या फरकाने भक्कम आघाडी घेतली. अखेरच्या सत्रात पुणे संघाने मुंबई विरुद्ध 70-30 असा 40 गुणांच्या फरकाने पराभव केला.
विजेत्या संघाकडून सलोनी पाटील ने 20 गुण करत महत्त्वाचा वाटा उचलला. तिला अनुषा सोनटक्केने 16 गुण करत मोलाची साथ दिली. मुलांच्या गटात नागपूर संघाने मुंबई उपनगर संघाचा 47-36 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वरिष्ठ वकील एस. के. जैन, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव, द नेचर मुकाई वाडीचे सुशील देशमुख, पिनाकल ग्रुपचे रोहन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव अपूर्व सोनटक्के, चंद्रशेखर आपटे, महा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय वेलुकर आदी उपस्थित होते.