राज्य परीक्षा परिषद, की भंगाराचे दुकान?

वरिष्ठांची डोळेझाक : पैसे असूनही स्वच्छतेकडे दुर्लक्ष

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणात टाकाऊ वस्तू, कचरा साचलेला आहे. परीक्षा परिषदेचा आवार हा आता भंगारमालाचा अड्डाच बनला असून यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्थमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती (एनएमएमएस), राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस), इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती, शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र व मॅन्युअल टायपिंग परीक्षा, डी.एल.एड, डेहराडूनच्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा, विभागीय सेवा प्रवेशोत्तर आदी विविध परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षांच्या प्रवेश फी, विविध प्रमाणपत्रांची फी, संस्थांचे नोंदणी व नूतनीकरण फी यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमतो.

परिषदेच्या विविध बॅंकांमध्ये सुमारे 210 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यावरील व्याजातूनच परिषदेचे कामकाज चालते आहे. परीक्षा घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमलेल्या आहेत. परिषदेच्या विविध विभागांत ठेकेदारीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भरणाही मोठा आहे.

कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीसाठीही आवश्‍यक पुरेशा सुविधाच येथे नाहीत. बैठक व्यवस्था तर सोडाच, पण पिण्यासाठी पाणीही नाही. कार्यालयातील वायरिंग लटकत्या अवस्थेत असून ते धोकादायक आहे. कार्यालयाच्या आवारात जुने भंगार, कचराखूप वर्षांपासून पडलेले आहे. यामुळे दुर्गंधी पसरते. आवाराची साफसफाईदेखील होत नाही. यामुळे अधिकारी, कर्मचारी अनेकदा आजारी पडल्याचे प्रकार घडतात. याबाबत अनेकदा त्यांच्याकडून व्यथाही मांडली जाते.

बड्या अधिकाऱ्यांना हे सर्व चित्र दिसत असूनही ते काहीच कार्यवाही करत नाहीत, हे अजबच आहे. कार्यालयाच्या डागडुजीसाठी बराच खर्चही होतो. मात्र, प्रत्यक्षात कामे दिसत नाहीत. नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याची चर्चा दोन वर्षापासून सुरू आहे. यासाठी 70 कोटी रुपये खर्चाचे नियोजनही आहे. मात्र, याकामासाठी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही पात्र सल्लागारच मिळालेला नाही. त्यामुळे हा विषय बारगळलेलाच आहे. दरम्यान, आता करोना प्रादूर्भावाची गंभीर दखल घेत आवाराची साफसफाई करण्याची आवश्‍यकता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.