पवनानगर -पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहनचालकांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
दोन वर्षांपासून करोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले. त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जगापुढे ते एक आव्हानच होते. त्या वेळी रुग्णवाहिका वाहनचालक यांनी अत्यंत मोलाचे असे कार्य करून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्या कमी झाली आहे.
मात्र, 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहनचालकांचे मार्च 2022 पासून वेतन मिळाले नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण, नागरिकांच्या असंख्य तक्रारी वारंवार येतात. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते अदा न केल्याच्याही तक्रारी आहेत. तसेच शासकीय कंत्राटी वाहनचालक यांच्याही तक्रारी सुरू झाल्या आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना माहिती देऊनही समाधानकारक उत्तर मिळत नाही. सध्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नतीचे आदेश असल्याने अधिकारी बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच कंत्राटी कर्मचारी वेतन अदा न केल्याने त्रस्त आहेत. करोनाकाळात दिलेली सेवा शासनाने आठवावी, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
कंत्राटी वाहनचालकांना शासन 24 तास राबवून घेत आहे. जेमतेम आठ ते नऊ हजार रुपये वेतन देत आहे. तेही वेळेवर मिळत नाही. या सर्व गोष्टी कामगार न्यायालयाच्या विरोधात असून, यावर प्रशासनाने दखल घेतली नाही. तसेच वाहनचालकांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी झटकले हात
सर्व वाहनचालकांनी पुणे जिल्हातील जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नदापूरकर यांची भेट घेतली. त्यांनी वाहनचालकांना तुमचे आमचे काही संबंध नाही. तुम्ही पुन्हा माझ्याकडे यायचे नाही. ज्यांनी कॉन्ट्रॅक्टर नेमले आहे, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, असे उत्तर दिले. तसेच पुणे जिल्ह्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, ते मुंबई आरोग्य भवन येथून नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे आमचा काही संबंध येत नाही. असे उत्तर रुग्णवाहिका चालकांना देण्यात आले.