पुणे –पुण्यात करोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. परंतु, ही लाट केव्हा संपेल हे अभ्यासाअंती सांगता येईल. तिसऱ्या लाटेत सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, महापालिकेने उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर बेडची तयारी ठेवली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी गुरुवारी मुख्यसभेत दिली.
शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, मनसेचे गटनेते साईनाथ बाबर, कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल आणि विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी मुख्यसभेत करोनाची सद्य:स्थिती, उपचार सुविधा आणि लसीकरणाच्या परिस्थितीबाबत उपस्थित केलेल्या विषयांवर डॉ. भारती यांनी खुलासा केला.
पुण्यातील तिसऱ्या लाटेचा आलेख उतरता आहे. तिसऱ्या लाटेत मृत्युदर कमी आहे. शहरात आतापर्यंत 415 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ही लाट केंव्हा उतरेल हे अभ्यासाअंती सांगता येईल. महापालिकेच्या बाणेर आणि नायडू या दोनच रुग्णालयांत 180 रुग्ण उपचार घेत असून उर्वरीत बेड रिकामे आहेत. रक्षकनगर येथील विलगीकरण कक्षात फक्त 10 रुग्ण आहेत. आपल्याकडे सध्या 13 हजार बेड उपलब्ध आहेत. आपण 25 हजारापर्यंत तयार करू शकतो एवढी आपली तयारी आहे. ऑक्सिजन बेड्सची गरज लागल्यास हडपसर येथील अण्णासाहेब मगर रुग्णालयात 30 बेडची सुविधा केली आहे. येरवडा येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 200 बेड असून तिथे किशोरवयीन मुलांवर उपचाराची सोय केली आहे. बाणेरचे नवीन आणि शिवाजीनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयदेखील अलर्टमोडवर आहेत, असे डॉ. भारती यांनी सांगितले.
30 हजार ज्येष्ठांना बुस्टर डोस
करोनाचा पहिला डोस 116 टक्के तर दुसरा डोस 85 टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. 15 ते 18 वर्षे दरम्यानच्या मुलांपैकी 42 टक्के मुलांना लस देण्यात आली आहे. 10 जानेवारीपासून बुस्टर डोस द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 30 हजार ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला आहे.