पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरी कॅम्प येथे जिजामाता रुग्णालय, मासूळकर कॉलनीतील रुग्णालय तसेच आकुर्डी येथील रुग्णालय बांधून तयार आहे. मात्र, तेथे रुग्णसेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. या रुग्णालयांसाठी आवश्यक डॉक्टर व तज्ज्ञांची नियुक्ती करून तेथे वैद्यकीय सेवा सुरू करावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी शुक्रवारी (दि. 12) केली आहे.
उपमहापौर हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी रुग्णालय व बेडची संख्या कमी पडत आहे.
महापालिकेची जिजामाता, मासूळकर कॉलनी व आकुर्डी हे 3 रुग्णालये बांधून तयार आहेत. तेथे वैद्यकीय मनुष्यबळाची नेमणूक करून ती रुग्णालये रुग्ण सेवेसाठी लवकरात लवकर सुरू करावीत. तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्त त्यांच्या मार्फत ही रुग्णालये मार्गी लावण्यासाठी निर्णय
घेण्यात यावा.
तसेच, शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची मदत करोना रुग्णांवरील उपचारासाठी घेण्यात यावी. त्यामुळे महापालिका डॉक्टरांवरील ताण कमी होईल. त्याबाबत पालिका प्रशासनाने शहरातील खासगी डॉक्टरांशी चर्चा करावी. पालिका रुग्णालय व क्वारंटाइन सेंटरसाठी खासगी डॉक्टरांची सक्तीने नियुक्ती करावी, अशी मागणी ही उपमहापौर हिंगे यांनी केली आहे.