पिरंगुट (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच मुळशीतील लोकांसाठी बेड उपलब्ध होत नाही, वेळेवर उपचार उपलब्ध नाही. वारंवार अशा अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे लवासा येथे तयार स्थितीमध्ये असलेले रिकामे हॉस्पिटल, हॉटेल, बंगलो येथे मुळशी करांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर करण्यात यावे, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तर्फे मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी केली आहे.
यासंदर्भात खासदार गिरीश बापट यांच्याशी चर्चा करून मुळशीकरांना तालुक्यात लवासा येथे स्वतंत्र कोविड सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. त्यावर खासदार बापट यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन पत्र दिले.
लवकरच मुळशी करांना स्वतंत्र असे सर्व सुविधांनी युक्त स्वतंत्र कोविड सेंटर उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देऊन लवकरात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली.