विम्बल्डन टेनिस स्पर्धा : अँडरसन व वॉवरिंक यांचा शानदार विजय

विम्बल्डन – अजिंक्‍यपदासाठी उत्सुक असलेल्या स्टानिस्लास वॉवरिंक व केविन अँडरसन यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर तीन सेट्‌समध्ये मात केली आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. महिलांमध्ये एलिना स्वितोलिना व मेडिसन कीज या मानांकित खेळाडूंनाही विजयी सलामी करताना फारशी अडचण आली नाही.

पुरुषांच्या एकेरीत वॉवरिंकने बेल्जियमच्या रुबेन वेमेल्मन्स याचा 6-3, 6-3, 6-2 असा पराभव केला. त्याने फोरहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्याने नेटजबळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. गतवर्षी येथे उपविजेतेपद मिळविणाऱ्या अँडरसन याने फ्रान्सच्या पिअरी ह्युजेस हर्बर्ट याचे आव्हान 6-3, 6-4, 6-2 असे संपुष्टात आणले. त्याने पासिंग शॉट्‌सचाअ सुरेख खेळ केला. तसेच त्याने व्हॉलीजवरही चांगले नियंत्रण राखले होते. त्याला यंदा चौथे मानांकन देण्यात आले आहे.

स्पेनच्या रॉबर्ट बॅटिस्टा ऍग्युट व फेलिसिआनो लोपेझ यांनीही विजयी सुरुवात केली. ऍग्युटने पीटर गोजोव्हिझ्क याचा 6-3, 6-2, 6-3 असा दणदणीत पराभव केला. त्याने जमिनिलगत परतीचे फटके मारले. लोपेझने अमेरिकन खेळाडू मार्कोस गिरॉन याला 6-4, 6-2, 6-4 असे पराभूत केले. त्याने बॅकहॅंडच्या ताकदवान फटक्‍यांचा उपयोग केला.
महिलांच्या विभागात आठवी मानांकित स्वितोलिनाने दारिया गेव्हरिलोवा हिच्यावर 7-5, 6-0 असा विजय मिळविला. पहिल्या सेटमध्ये दारियाने तिला चिवट लढत दिली.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र, तिची दमछाक झाली. स्वितोलिनाने या सेटमध्ये तीन वेळा सर्व्हिसब्रेक मिळविला. तिने फोरहॅंडचे सुरेख फटके मारले. कीज हिने थायलंडच्या ल्युसिका कुमखुम हिला 6-3, 6-2 असे हरविले. या लढतीत तिने परतीचे खणखणीत फटके मारले. युक्रेनच्या डायना येस्त्रेमिस्का हिने कॅमिली पिओर्जी हिच्यावर 6-3, 6-3 असा विजय मिळविला.

मारिया सॅक्री हिने ग्रीसच्या बर्नान्डा पेरा हिचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. चेक प्रजासत्ताकच्या मेरी बोजकोवा हिने मोना बार्थेल हिचे आव्हान 6-3,ल्‌ 6-3 असे संपविले. स्लोवाकियाच्या व्हिक्‍टोरिया कुझमेवा हिने पोलोना हिर्कोर्ग हिच्यावर 6-4, 6-1 अशी मात केली. रशियन खेळाडू मार्गारिटा गॅस्पीर्यान हिने जर्मन खेळाडू ऍनालिना फ्रिडस्म हिला 6-4, 6-4 असे पराभूल केले व दुसरी फेरी गाठली.

Leave A Reply

Your email address will not be published.