पुणे: द पूना क्लब लिमिटेड आणि महाराष्ट्र बिलियर्डस अँड स्नूकर (बीएसएएम) यांच्या संलग्नतेने बीएसएएम सिक्स रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत विविध चरणामधील अव्वल स्नूकरपटूसह माजी राष्ट्रीय विजेता शिवम अरोरा, हसन बदामी, मानव पांचाळ आणि तहा खान यांसारखे मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
पहिली स्पर्धा पुण्यात 2008 मध्ये आयोजित करण्यात आली होती. स्नूकर या खेळाचे लघुत्तम स्वरूप असलेल्या या स्पर्धेने आता चांगलीच लोकप्रियता मिळवली असून शहरात अशा प्रकारच्या विविध स्पर्धा होत असतात. क्रिकेटच्या टी-20 प्रकाराप्रमाणेच सिक्स रेड स्नूकर हा मूळ 15 रेड स्नूकर या मूळ खेळाचे छोटे व वेगवान रूप आहे.
पूना क्लब येथे ही फेरी खेळवली जाणार आहे. यातून मुख्य
स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू त्यानंतर गेल्यावर्षीच्या राज्य मानांकन स्पर्धेतील अव्वल 8 खेळाडूंशी स्पर्धा करणार आहेत. पात्रता फेरीचे सामने बेस्ट ऑफ 7 फ्रेम्सचे होणार असून बाद फेरीचे सामने 9 फ्रेम्सचे होणार आहेत. अंतिम सामना 13 नोव्हेंबर 2019 रोजी होणार असून हा बेस्ट ऑफ 13 फ्रेम्सचा होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोलेपाटील आणि बीएसएएमचे अध्यक्ष राजन खिंवसरा यांच्या हस्ते आज होणार आहे. या स्पर्धेतील अव्वल 10 खेळाडू 2020 च्या प्रारंभी होणाऱ्या सिक्स रेड राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.