पुणे, दि. 19 -गणेशोत्सव दोन दिवसांवर असताना महापालिकेने गणेश मूर्ती विसर्जन स्टॉल लावण्याला महापालिकेने परवानगी दिली आहे. गणेश कला क्रीडासह 41 ठिकाणी हे स्टॉल लावण्यात येणार आहे. महापौरांच्या हस्ते या स्टॉलविक्रीच्या स्टॉल्सचे गुरुवारी उद्घाटन होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून स्टॉल विक्रेत्यांनी महापालिका प्रशासनाला साकडे घातले होते. याशिवाय काही विक्रेत्यांनी विनापरवाना स्टॉल्स लावले. त्यावर अतिक्रमण नियंत्रण विभागाने कारवाई केली. वास्तविक नागरिक पंधरा दिवस आधीपासूनच गणेशमूर्ती बुक करतात. गणेशमूर्ती निवडण्यासाठी हा कालावधी जातो. त्यामुळे आधीच या परवानगी देणे आवश्यक होते. तसे न करता हा विषय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनीही भिजत घोंगडे ठेवला आणि अवघे दोनच दिवस शिल्लक असताना या स्टॉलचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्टॉलधारकांना खासगी मोकळ्या मैदानांमध्ये स्टॉल लावण्याला परवानगी देण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परंतु तेथील दर स्टॉलधारकांना परवडणारे नव्हते. त्याविषयीही या स्टॉलधारकांनी तक्रार केली होती.