अस्वच्छ, धूर सोडत खडखड वाजत एसटी धावतेय रस्त्यावर

प्रवाशांची पाठ तर महामंडळाच्या उत्पन्नाची वाट

सातारा – सातारा विभागात गेल्या अडीच वर्षांत एकही नवी एसटी बस आली नाही, त्यामुळे दहा वर्षे होऊन मुदत संपलेल्या 125 पेक्षा अधिक बस बॉड्या बदलून, डागडुजी करून अजूनही रस्त्यावर धावत आहेत. नव्या बस येत नसल्याने पूर्वी 8 ते 10 वर्षे होऊनही अशा बस स्क्रॅपमध्ये काढल्या जात नाहीत. आता शिवशाही बसेसच्या अतिलाडाने महामंडळाच्या परिवहन महामंडळाच्या बसेसकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

जिल्ह्यातील एसटी बस वेळेवर न सुटण्यासह धुर सोडत, अस्वच्छता आदी कारणांमुळे गाड्यांची वाताहत झाली असून प्रवाशी बेजार झाले आहेत. यामुळे या गाड्यातून प्रवास करण्यास प्रवाशांची पाठ तर महामंडळाच्या उत्पन्नाची वाट लागत असल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाची प्रवाशी वाहतूक व्यवस्था ही राज्याची जीवनवाहिनी समजली जाते. आजअखेर उशिरा जाईन पण एसटीने जाईन, असे म्हणणारे प्रवाशी महामंडळाच्या याच गाड्यांना वैतागले आहेत. अनेक बसेस मोठ्या प्रमाणावर धूर सोडत, खडखड वाजत, अस्वच्छ दिसतात. मेंटेनन्ससाठी अनेक बस वर्कशॉपमध्ये अडकल्याने प्रवाशांसाठी बसची कमतरता भासू लागली आहे. रस्त्यातच बस बंद पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

कसरत आणि दमछाक यापूर्वी प्रत्येक बसचा वापर किमान 8 ते 10 वर्षापर्यंत होऊन नंतर ती गाडी स्क्रॅप केली जात असे. त्यानंतर महामंडळाकडून नवीन बसेस तत्काळ दिल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षात महामंडळाची अनेक कारणाने वाताहत सुरू झाली असून उतरती कळा लागली आहे. सातारा विभागात गेल्या अडीच वर्षांत एकही नवी बस आली नसल्याने जुन्या गाड्यांना दुरुस्ती करत, काहींच्या बॉडी बदलल्या असून त्याही रस्त्यावर धावतात. यामुळे गाड्यांचा मेंन्टेनन्स वाढत असून अनेक बस वर्कशॉपच्या दारात तर काही रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सगळीकडे बसेस खडखड वाजत फिरतात, वायफायचे बंद पडलेले सांगाडे लोंबकळताना दिसतात तर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून अस्वच्छ अशा गाड्यांमुळे प्रवाशी बेजार होण्यापेक्षा ते पाठ फिरवत असल्याने महामंडळाचे उत्पन्न घटत असून खर्च मात्र वाढत आहे.

सर्व निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून घेतले जात असल्याने अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष काम करताना कसरत तर अशा बसेस चालवणाऱ्या चालकांची दमछाक होताना दिसते. जिल्ह्यात सध्या 800 बसेस असून तर 53 शिवशाही बसेस आहेत. तर 125 हून अधिक गाड्या दहा वर्षापेक्षा अधिक काळ मेंटेनन्सशिवाय रस्त्यावर धावतात. दुष्काळी भागातील मुलांना मोफत प्रवाशी पास देत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या महामंडळाला खासगी वाहतुकीशी स्पर्धा आहे. नव्या, स्वच्छ, वेळेवर गाड्यांची गरज असून प्रवाशांची जीवनवाहिनी असली तरी प्रवाशांच्या सुविधांच्या अडचणी संपलेल्या नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.