पुण्याहून 4 शहरांसाठी ई-बस लवकरच सुरू होणार
पुणे – पर्यावरणपूरक प्रवासासाठी एस.टी. महामंडळाच्या ई-बस लवकरच संचलनात येणार आहेत. पुणे शहरापासून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि औरंगाबाददरम्यान या बसेस धावणार आहेत. याबाबत सोमवारी पुणे विभागीय कार्यालयातील बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दृष्टीने राज्यात सर्वाधिक ई-बसची संख्या पुण्यात आहे. या बस संचलनात आणण्यासाठी सुरुवातीला काहीसा विरोध झाला. मात्र, सध्या या बसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याच धर्तीवर एस.टी. महामंडळातही ई-बस सुरू होणार आहेत. सध्या राज्यभरात डिझेलवर चालणाऱ्या 20 हजार एस.टी. बसेस संचलनात आहेत. आता महामंडळाच्या ताफ्यात 50 ई-बस दाखल होणार असून चार्जिंग झाल्यानंतर सुमारे 250 कि.मी.पर्यंत धावण्याची क्षमता असणार आहे.
स्वारगेट येथे चार्जिंग
स्वारगेट आगारात आता ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तसेच पुण्यापासून ई-बस धावणाऱ्या चारही मार्गावर एस.टी.च्या विभागीय कार्यालयात चार्जिंग स्टेशन बसवण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू आहे. याबाबत पुढील तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.