पुणे, दि. 24- एसटीच्या लाइव्ह ट्रॅकिंगला करोनामुळे जबर दणका बसला आहे. लाइव्ह ट्रॅकिंग सुविधा सुरू होण्याआगोदरच बासनात गुंडाळल्यात जमा असल्याची खात्रीलायक माहिती एसटीच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. जून महिन्यापर्यंत एसटीच्या सर्व 17 हजार गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार होती. मात्र करोनामुळे अद्यापही एकाही बसमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली नसून भविष्यात ती बसविली जाईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्याने साशंकता व्यक्त केली.
सुमारे 32 कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता. परंतु, करोनामुळे आधीच प्रचंड तोट्यात असणाऱ्या एसटीला ही रक्कम परवडणारी नसून त्यामुळे ती सुरू होणार नसल्याचे सूतोवाच देण्यात आले. संबंधित प्रवाशाच्या मोबाइलवर एक लिंक येईल, ज्याद्वारे आगारात गाडी कधी येणार, पुढील स्थानक कोणते, सध्या बस कुठे आहे (करंट लोकेशन), गाडी कुठल्या फलाटावर लागेल, आदींची माहिती प्रवाशाला चुटकीसरशी कळू शकेल, अशी ही यंत्रणा होती.
ट्रॅकिंग डिव्हाइसचा वन टाइम खर्च महामंडळाला उचलावा लागणार होता. हे एक उपग्रह आधारित तंत्रज्ञान असून हे तंत्र बस अचूक ट्रॅक करते, अशी ही यंत्रणा आहे. खासगी बसेसमध्ये फार पूर्वीच ही सुविधा उपलब्ध असून एसटीत मात्र अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. करोनामुळे मात्र लाइव्ह ट्रॅकिंगची शक्यता आता पूर्णतः मावळली आहे.