‘पार्सल’ 10 पर्यंत सुरू राहणार
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, आता सायंकाळी 7 वाजेनंतरही पार्सल सेवा सुरू ठेवता येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. पार्सल सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी सायंकाळी 7 वाजता हॉटेल बंद करण्याची आता आवश्यकता नाही, तर ते रात्री 10 पर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवू शकतील, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सायंकाळी 7 वाजेनंतर सुरू राहणाऱ्या हॉटेलवर गेल्या काही दिवसांपासून कारवाई करण्यात येत होती. याचे तीव्र पडसाद शहरात उमटत होते. त्यामुळे पार्सल सेवा रात्री 10 पर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती.
दरम्यान, करोनामुळे पुरती वाताहात झालेल्या हॉटेल इंडस्ट्रीला मदतीच्या हाताची नितांत गरज निर्माण झाली आहे. सर्वच बाजूंनी हॉटेल व्यावसायिकांची पुरती कोंडी झाली असून नवा पैसा तर सोडाच, तोटा मात्र दुप्पट, तिप्पट होत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील डाइन इन सुविधा बंद असून केवळ पार्सलवरच हा धंदा सुरू आहे.
ज्या हॉटेलमध्ये परमिट रूम-बार होते, अशांना बारच्या रेटला मद्य विकू दिले जात नसून वाइन शॉपच्या रेटलाच (एमआरपी) विका, असे स्पष्ट आदेश दिले गेले आहेत.
तसेच 5 टक्के व्हॅटही लावला जात असून त्यामुळे बारचालकांना एका बाटलीमागे केवळ 2 ते 3 रुपये मिळत असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. जीएसटी माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, या मागणीकडे देखील अद्याप कानाडोळाच केला गेल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे.