पुणे – सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (एसआरटीएल) अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन हेमंत लिंबू याने १०० किलोमिटर अंतर असलेली रन ११ तास ४१ मिनिटात पुर्ण केली. महिलांमध्ये चंद्रभागा कचरे यांनी हे अंतर १९ तास ३७ मिनिटात पूर्ण केले. वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन आयोजित अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन या महाराष्ट्रातील पहिल्या आणि भारतातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या स्पर्धेचे हे सहावे पर्व होते. ४ विविध अंतर श्रेणींमध्ये ७ देशातून आणि २४ राज्यातील तब्बल १००० खेळाडूंचा सहभाग असलेली ही मॅरेथॉन सह्याद्रीच्या डोंगररांगेत यशस्वी पार पडली.
हेमंतने एसआरटी स्पर्धेच्या मागील पाच वर्षांचे सर्व विक्रम यावेळी मोडीत काढले. हा ट्रेल रनिंग मधला राष्ट्रीय विक्रम असल्याचा दावा एसआरटीच्या आयोजकांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या रिंबिक गावातील हेमंत लिंबू हा २६ वर्षाच्या युवक आहे. त्याने ११ तास ४१ मिनिटात १०० किलोमीटरचे अंतर आणि ३८०० मीटरची चढाई करत भारतातील अल्ट्रा धावपट्टुंमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, अमर धुमाळ, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव व टीम डब्ल्युजीआरएफच्या ५०० स्वयंसेवकांनी यासाठी अथक परिश्रम केले. स्पर्धेचे उद्घाटन माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले. या स्पर्धेत तब्बल ६३ रनर्सने १०० किलोमीटरचे अंतर वेळेत पूर्ण केल्यामुळे केवळ ही स्पर्धा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या ट्रेल रनिंग विश्वाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे.
Khelo India Para Games 2023 : महाराष्ट्राच्या वैभवराजे रणदिवेला नेमबाजीत ब्रॉंझपदक….
एसआरटीएल ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील युटीएमबी पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात. सिंहगडाच्या पायथा गोळेवाडी येथे पहाटे सहा वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोषात सुरू झाली. वेल्ह्यातील तोरणा विद्यालयात सांगता झाली. पर्यावरण रक्षण व गडकोट संवर्धनाचा संदेश देणारी स्पर्धा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना समर्पित केली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग, राज्य पूरातत्त्व विभाग, पुणे वन विभाग, महाराष्ट्र पोलिस दल, महाराष्ट्र शासन यांच्या विशेष परवानगीने मान्यता मिळाली. तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, बिव्हीजी ग्रूप, सिंहगड ग्रूप ऑफ इंस्टिट्युट्स, व या मार्गावरील ग्रामपंचायतींचे व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.