रामनाथपूरम, (तामिळनाडू) :- श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेल्या 22 भारतीय मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश श्रीलंकेतील न्यायालयाने दिले आहेत. तामिळनाडूतील मच्छिमारांच्या संघटनेने ही माहिती दिली आहे.
श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाकडून 22 जून रोजी मच्छिमारांच्या 4 नौका जप्त करण्यात आल्या असून 22 मच्छिमारांना अटक करण्यात आली होती.
तामिळनाडूच्या रामनाथपूरम जिल्ह्यातील मंडपम आणि पुदुकोट्टई मासेमारी बंदरांवरून निघालेल्या मच्छिमारांना जाफनामधील डेल्फ्ट बेटजवळ अटक करण्यात आली होती.
या मच्छिमारांना जाफनातील न्यायालयाने 5 जुलैपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने सर्व मच्छिमारांच्या सुटकेचे आदेश दिले.