इस्लामाबाद :- आशिया चषका क्रिकेट स्पर्धेबाबत सातत्याने वाद होत आहेत. आता पुन्हा एकदा वेळापत्रकाला विलंब झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. पीसीबीचे नवे प्रमुख श्रीलंकेसोबत यजमानपद शेअर करण्याबद्दल खूश नाहीत. यावेळी आशिया चषक पाकिस्तानातच व्हावा, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे हायब्रीड मॉडेलवर पुन्हा विचार होणार का, याची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आशिया चषकाबाबत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक 2023 वर पुन्हा यू-टर्न घेतला आहे. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात परिस्थितीवर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा होणार आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त आशिया चषक 2023 श्रीलंकेत खेळवला जाईल; परंतु पीसीबीची नवीन मागणी आहे की स्पर्धेचे सर्व सामने पाकिस्तानच्या भूमीवर खेळले जावेत.
या आठवड्यात स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असे मानले जात होते. पाकिस्तानचे क्रीडा मंत्री एहसान मजारी यांनी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला आहे. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी नवेच हायब्रीड मॉडेल एसीसीला सादर केले आहे.
आधीच्या हायब्रीड मॉडेलनुसार, पाकिस्तान संघ बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आणि अफगाणिस्तान विरुद्ध पहिले चार सामने खेळणार आहे. यानंतर सर्व संघ श्रीलंकेला जातील, जिथे भारत विरुद्ध पाकिस्तानसह इतर सामने होतील. ही स्पर्धा 31 ऑगस्टपासून सुरू होणार होती आणि 17 सप्टेंबरला अंतिम सामना होणार होता.