कोलोंबो: श्रीलंकेच्या नौदलाए भारताच्या किमान 14 मच्छिमारांना अटक केली आहे आणि त्या मच्छिमारांचे 3 ट्रॉलर्सदेखील ताब्यात घेतले आहेत. श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी केल्याच्या कथित आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी डेल्फ्ट बेटाच्या उत्तरेकडील समुद्रामध्ये हे मच्छिमार मासेमारी करत होते, असे नौदलाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेले या मच्छिमारांची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी जाफना शहरातील मत्स्योद्योग सहायक संचालकांकडे सोपवले जाणार आहेत. श्रीलंकेच्या नौदलाकडून सागरी हद्दीमध्ये गस्त वाढवल्यामुळे भारतीय मच्छिमारांकडून सागरी सीमा ओलांडून श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी करायला जाण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. भारतीय मासेमारी उद्योगाची घुसखोरी रोखण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये श्रीलंकेच्या नौदलाने आपल्या सागरी हद्दीत अलेल्या नौकांवरील दंडाची रक्कम 100 पट वाढवली आहे.