कोलंबो – अँजेलो मॅथ्युज व दासून शनाका यांच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेतही 3-0 असा विजय मिळविला.
Angelo Mathews hit 87 to help Sri Lanka seal a 3-0 series win over Bangladesh. #SLvBAN REPORT ⬇️ https://t.co/yW8kEJbhd7
— ICC (@ICC) August 1, 2019
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 बाद 294 धावा केल्या. त्यामध्ये मॅथ्युज व कुशल मेंडिस यांनी केलेल्या अर्धशतकांचा मोठा वाटा होता. त्यानंतर शनाका व कासून रजीता यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे बांगलादेशचा डाव 36 षटकांत 172 धावांमध्ये कोसळला.
बांगलादेशच्या गोलंदाजांना अपेक्षेइतका अचूक मारा करता आला नाही. त्याचा फायदा लंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मिळाला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (6 चौकारांसह 46) व कुशल परेरा (5 चौकारांसह 42) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करीत चांगला पाया रचला. त्यामुळे मॅथ्युज व मेंडिस यांनी कोणतेही दडपण व घेता खेळ केला. त्यांनी 101 धावांची भागीदारी रचली. मेंडिसने 5 चौकार व एक षटकारासह 54 धावा केल्या. मॅथ्युजने 8 चौकार व एक षटकारासह 87 धावा टोलविल्या. शनाकाने 30 धावा जमविताना 2 षटकार व 2 चौकार अशी फटकेबाजी केली. बांगलादेशच्या शफीउल इस्लाम व सौम्य सरकार यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
लंकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडविली. सरकार व इस्लाम यांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज खेळपट्टीवर फार वेळ टिकला नाही. सरकारने 5 चौकार व एक षटकारासह 69 धावा केल्या. इस्लामने नाबाद 39 धावांमध्ये 5 चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. लंकेच्या शनाकाने 27 धावांमध्ये तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका 50 षटकांत 8 बाद 294 (अँजेलो मॅथ्युज 87, कुशल मेंडिस 54, दिमुथ करूणारत्ने 46, कुशल परेरा 42, दासून शनाका 30, शफीउल इस्लाम 3-68, सौम्य सरकार 3-56) बांगलादेश 36 षटकांत सर्वबाद 172 (सौम्य सरकार 69, शफीउल इस्लाम नाबाद 39, दासून शनाका 3-27, कसून रजीता 2-17, लाहिरू कुमारा 2-26)