कोलंबो – आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत इंधनाचा साठा जवळपास संपल्यातच जमा असून खासगी वाहनांना आता पेट्रोल विक्री बंदच करण्यात आली आहे. आवश्यक वाहनांपुरतीच इंधन विक्री आता तिकडे केली जात आहे. नागरीकांना विनाकारण प्रवास करण्याचे किंवा बाहेर जाण्याचे टाळण्याची सूचना करण्यात आली असून त्यांना घरातच थांबून राहण्यास सांगण्यात आले आहे. या अभुतपूर्व स्थितीने नागरीक पुरते हैराण झाले आहेत.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात इंधन स्थितीचा आढावा घेण्यात आला. खासगी वाहनांना 10 जुलैपर्यंत इंधन विक्री करण्यास मनाई करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. काही ठिकाणी आंतरराज्यीय प्रवासी वाहतूकही थांबवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा आणि अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच इंधन देण्याची सुचना संबंधीतांना करण्यात आली आहे.
देशातील बहुतेक कंपन्या आणि खासगी संस्थांना आपले कामकाज ऑनलाईन पद्धतीनेच चालवण्याची सुचनाहीं करण्यात आली आहे. सरकारचे प्रवक्ते बंडुला गुणवर्धने यांनी सांगितले की सरकारची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली असून परकीय चलन गंगाजळीचा खडखडाट झाला आहे.
देशाची अर्थ व्यवस्था पुर्ण कोलमडली असल्याची माहिती पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी गेल्याच आठवड्यात संसद सदस्यांना दिली आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी त्यांना अजून पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.