पेशावर – पाकिस्तानात पुन्हा एकदा पोलिओ लसीकरण पथकावर हल्ला करण्यात आला असून त्यात तिघेजण ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. उत्तर वझिरीस्तान प्रांताच्या आदिवासी भागात लसीकरणासाठी हे पथक गेले असता काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी या पथकावर गोळीबार केला.
उत्तर वझिरीस्तान प्रांतात या वर्षी पोलिओचे 9 नवीन रुग्ण आढळून आल्यामुळे घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आज झालेल्या हल्ल्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
पाकिस्तानात पोलिओ विरोधी लसीकरण पथकांवर हल्ले होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. मार्च महिन्यात पोलिओ लसीकरण पथकातील एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर जानेवारी महिन्यात अशा पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.