श्रीलंकन नौदलाने केली 54 भारतीय मच्छिमारांना अटक

कोलंबो, दि.25 –श्रीलंकन नौदलाने पुन्हा एकदा सागरी क्षेत्रात कुरापती करत 54 भारतीय मच्छिमारांना अटक केली. ते मच्छिमार तामीळनाडूचे रहिवासी आहेत. त्यांच्या 5 नौकाही जप्त करण्यात आल्या.

मासेमारीसाठी तामीळनाडूतील मच्छिमार काही दिवसांपूर्वी समुद्रात गेले. त्यांनी श्रीलंकन सागरी हद्दीत अवैध शिरकाव केल्याचा कांगावा करून त्या देशाच्या नौदलाने कारवाई केली. भारतीय मच्छिमारांची जाळीही श्रीलंकन नौदलाने ताब्यात घेतली. अलिकडेच श्रीलंकन चाच्यांनी भारतीय मच्छिमारांवर हल्ले केल्याच्या दोन घटना घडल्या.

त्यापाठोपाठ श्रीलंकन नौदलाची कुरापत समोर आली. अर्थात, त्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर कारवाई होण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्याबाबत तामीळनाडूतून नेहमीच तीव्र नाराजी व्यक्त होत असते. त्याची दखल घेऊन भारत सरकार श्रीलंकेकडे त्या देशाच्या नौदलाकडून होणाऱ्या कुरापतींचा निषेधही करते.

मानवतावादी भूमिकेतून मच्छिमारांच्या मुद्‌द्‌यावर तोडगा काढण्याविषयी भारत आणि श्रीलंकेत नेहमी सहमती होते. मात्र, त्यानंतरही भारतीय मच्छिमारांवर हल्ले किंवा कारवाई होण्याच्या घटनांना लगाम बसलेला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.