बर्लिन – कॅन्सर अर्थात कर्करोग म्हटले की पोटात भीतीचा गोळा उठतो. या जीवघेण्या आजारामुळे हजारो जणांना जगभरात प्राणास मुकावे लागते आहे. त्यावरील उपचारही प्रचंड त्रासदायक असतात. कॅन्सरग्रस्तांना केमो आणि रेडियो थेरपीसारख्या वेदनादायी उपचार पद्धतीला सामोरे जावे लागते.
मात्र आता या वेदनेतून कॅन्सरग्रस्तांची सुटका होणार असल्याची दिलासादायक बातमी आहे. कारण येत्या दोन वर्षांमध्ये कॅन्सरवर लस येणार असल्याचा दावा जर्मनीच्या संशोधकांनी दावा केला आहे.
बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम टयुरेशी यांनी करोनावर फायजर लस तयार केली आहे. ही लस सध्या अनेक देशांमध्ये वापरली जाते. याच दांपत्याने आता कॅन्सरवरील लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यांचा हा दावा खरा ठरला तर भविष्यात कॅन्सरवर तात्काळ उपचार होऊ शकतात आणि कॅन्सरला कायमचे पराभूत केले जाउ शकते.
या दाम्पत्याने टयूमरविरोधात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्षम करण्यावर यशस्वी संशोधन केले आहे. जर सगळे व्यवस्थित पार पडले, तर येत्या दोन वर्षांत कॅन्सरवर देखील लस उपलब्ध होईल असा दावा त्यांनी केला आहे.