नवी दिल्ली, दि.25 –सीबीआयने गुरूवारी मुंबईसह देशातील 100 ठिकाणी छापे टाकले. तब्बल 3 हजार 700 कोटी रूपयांच्या विविध बॅंक घोटाळ्यांवरून ती कारवाई करण्यात आली.
इंडियन ओव्हरसीज बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बॅंक, इंडियन बॅंक आणि सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने घोटाळ्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यावरून सीबीआयने 30 गुन्हे नोंदवले आहेत. त्यावरून पुढील कारवाई करताना 11 राज्यांत झाडाझडती घेण्यात आली.
त्यानुसार, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, कानपूर, मथुरा, चेन्नई, हैदराबाद, भोपाळ, जयपूर आणि इतर काही शहरांत छापासत्र हाती घेण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांकडून विविध प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. त्यांची छाननी करून तपास केला जात आहे. दोषींवर कारवाई करण्याच्या आणि जनतेचा पैसा वाचवण्याच्या उद्देशातून पाऊले उचलली जात आहेत, असे सीबीआयकडून नमूद करण्यात आले.