स्पुटनिकचे पुण्यात सप्टेंबरपासून उत्पादन

"सीरम'च्या हडपसर केंद्रात वर्षाला 30 कोटी मात्रांचे उत्पादन होणार

पुणे / नवी दिल्ली – रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये या सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. रशियन थेट परकीय गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) आणि सीरमने ही घोषणा केली.

भारताच्या औषध नियामकांनी चार जुलै रोजी चाचाणीसाठी लसीची लहान तुकडीच्या उत्पादनास परवानगी दिली होती. सीरमच्या हडपसर येथील केंद्रात हे उत्पादन घेण्यात येईल. त्याचा विनियोग मुख्यत: चाचणीसाठी करण्यात येईल. स्पुटनिकचे सीरममधून पहिले उत्पादन सप्टेंबर महिन्यात बाहेर पडेल, अशी अपेक्षा आहे. 

भारतात या लसीचे दरवर्षी 30 कोटी मात्रांची निर्मिती करण्यात येईल. तांत्रिक हस्तांतर प्रक्रियेचा भाग म्हणून सीरम इन्स्टिट्यूटला यापुर्वीच लसीचे “सेल आणि व्हेक्‍टर सॅंपल’ मिळाले आहेत. त्याला भारतीय औषध नियामकांनी आयातीची परवानगी दिल्यानंतर त्याची “कल्टीव्हेशन’ प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सीरममध्ये सध्या ऑक्‍सफर्ड – ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. नोव्हाव्हॅक्‍सने करोनावर शोधलेल्या लसीचे स्थानिक बाजारपेठेत कोव्होव्हॅक्‍स नावाने उत्पादन सुरू आहे. या शिवाय कोडॅजेनिक्‍स या लसीच्या इंग्लंडमध्ये मानवावरील चाचण्या सुरू आहेत.

स्पुटनिक लसीच्या उत्पादनाचे भारत हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. विविध संस्थांशी करार करून भारतात 85 कोटी डोसचे वर्षभरात उत्पादन केले जाणार आहे. ग्लॅंड फार्मा, हेतेरो बायोफार्मा, पॅनॅसिया आयोटेक, स्टेलीस बायोफार्मा, विचोर बायोफार्मा आणि अन्य काही कंपन्यांनी या रशीयन लसीच्या उत्पादनाचे करार केले आहेत.

आरडीआयएफचा भागिदारीत स्पुटनिक लसीचे उत्पादन करण्यात मला आनंद होत आहे. येत्या महिन्यात आम्ही लाखो मात्रांचे उत्पादन करू अशी आम्हाला आशा आहे. त्याच्या चाचाणीसाठी उत्पादन सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येईल. भारत आणि जगातील सर्व नागरिकांना स्पुटनिक लस, त्याची उच्च परिणामकारकता आणि सुरक्षिततेमुळे हवी आहे.

मात्र त्या सर्वांना ती पुरवता येणे कठीण आहे. विषाणूच्या अनिश्‍चिततेमुळे सर्व आंतरराष्ट्रीय संस्था आणि सरकार यांनी साथीला तोंड देण्यासाठी एकत्र येऊन काम करणे आवश्‍यक आहे, असे सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी निवेदनात नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.