मंचर बाजार समितीत करोना रोखण्यासाठी विविध उपाय
मंचर -आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्याची माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
मंचर बाजार समितीत फ्लॉवर, मिरची, काकडी, वांगी, फरशी, कोबी, कारले, वाटाणा शेंगा इत्यादी तरकारी मालाची मोठ्या प्रमाणात आवक होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंचर बाजार समितीने शुक्रवार (दि. 20) पासून गुरुवार (दि. 26) पर्यंत बाजार समिती बंद ठेवली; परंतु सरकारी आदेशानुसार शुक्रवारी (दि. 27) मंचर बाजार समिती सुरू झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी स्वतः बाजार समितीत न येता फक्त वाहनचालकासोबत तरकारी माल पाठवावा. चालकासोबत मालाचे नाव, किती डाग आणि मोबाइल नंबर द्यायचा आहे.
चालक गेटवर गाडी घेऊन आल्यावर त्यांच्या हातांवर सॅनिटायझर फवारले जाईल, तसेच मास्क लावून चालकाने यावे. त्यानंतर बाजार समितीमध्ये गाडीला प्रवेश देऊन तरकारी माल खाली केला जाईल, असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.
बाजारभाव, वजन याची माहिती शेतकऱ्यांना मोबाइल ऍपद्वारे घरबसल्या कळविली जात आहे, त्यामुळे बाजार समितीत फारशी गर्दी झाली नाही. बाजार समितीच्या आवारातील स्वच्छता करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी, व्यापारी, हमाल यांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– देवदत्त निकम,
सभापती