बीजिंग – चीन करोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून त्या देशात गेल्या तीन दिवसांत स्थानिक नागरिकांना करोनाची लागण झाल्याची केवळ एकच केस आढळून आली आहे. तथापि विदेशातून चीनमध्ये आलेल्यांना या रोगाची लागण होण्याचे प्रमाण मात्र अजून कमी झालेले नाही.
काल दिवसभरात विदेशातून चीनमध्ये आलेल्या नागरिकांपैकी 54 जणांना याची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, चीनमध्ये नव्याने सापडलेला करोनाचा स्थानिक रुग्ण झेजियांग प्रांतातील आहे. करोनाग्रस्त हुबेई प्रांत किंवा वुहान शहरात गेल्या काही दिवसांमध्ये एकही नवीन करोना रुग्ण आढळून आलेला नाहीे.
तथापि हुबेई प्रांतात आधीच ज्यांना करोना झालेला आहे, त्यातील पाच रुग्ण काल दगावल्याने या रोगामुळे चीनमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 3292 इतकी झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चीनमध्ये एकूण 81 हजार 340 रुग्णांना करोनाची बाधा झाली होती त्यापैकी अनेक जण बरे होऊन घरी गेले असून आता तेथे केवळ 3460 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.