पुणे – पुण्याचा युवा कुस्तीपटू तनिष्क कदम याने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर नवी कामगिरी केली. आता त्याचे लक्ष्य लॉस एंजलीसला 2028 साली होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाचे आहे. मात्र, त्याच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी भारतीय कुस्ती संघटना तसेच राज्यातील क्रीडा मंत्रालय व समाजातील क्रीडाप्रेमी समूह तसेच व्यक्ती पुढाकार घेणार का?
हरियाणात गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तनिष्कने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापतही झाली होती. मात्र, अत्यंत जिद्दीच्या जोरावर त्याने त्यानंतर बहारीनमध्ये झालेल्या 15 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत दुखापतीवर मात करत 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलेच सुवर्णपदकही ठरले होते.
आता त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो लवकरच पूर्ण तंदुरुस्त होत सरावालाही प्रारंभ करणार आहे. त्याला रशियातील प्रख्यात डगेस्तन व उत्तर ओसेटिया या कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय राजधानी ठरलेल्या राज्यात तनिष्कला सराव करायचा आहे. याच शहरांतून सराव करत पुढे आलेल्या रशियातील जवुर उगेव्ह, जउरबेक सीदाकोव्ह, गात्झीमुराद रशीदोव्ह व अर्तुर नोइफोनोव्ह या पाच कुस्तीपटूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवली होती.
याच ठिकाणी तनिष्क सराव व अनुभव घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तनिष्क सह्याद्री कुस्ती संकुल, वारजे येथे भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, कुस्ती प्रशिक्षक संदीप पटारे, राजकुमार शंभू नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतो.
शस्त्रक्रियेनंतर पूर्ण तंदुरुस्त ठरल्यावर पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारीत त्याला रशियाला जाऊन ऑलिम्पिकच्या दृष्टीने सराव करायचा आहे. 2015 ते 2017 सालापर्यंत तो पुणे महापौर करंडक स्पर्धेत पहिल्या स्थानी होता. तसेच यंदाच्या मोसमात त्याने 15 व 17 वर्षांखालील गटातही सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे. लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये देशाला कुस्तीत पदक प्राप्त करून देण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूला मदत करण्यासाठी पुढाकार कोण घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.