क्रीडाधिकारी नावंदे सक्तीच्या रजेवर

चौकशीनंतर बदलीचे आदेशः शिक्षणमंत्री शेलार, पालकमंत्री शिंदेंचा झटका

नगर – गेल्या महिन्याभरापासून क्रीडा संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यातील विकोपाला गेलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमिवर आज मुंबई शिक्षणमंत्री अशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नावंदे यांना सक्‍तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला. त्याबरोबर नावंदे यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्यात येवू कारवाई करण्याचे आदेश शेलार यांनी दिले.

गेल्या महिन्यापासून शिक्षक संघटना व कविता नावंदे यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला. क्रीडा शिक्षक संघटना, विद्यार्थी व पालक यांच्यात नावंदे यांच्याबाबत वाढती नाराजीमुळे जिल्ह्यातील सर्व क्रीडा स्पर्धा रखडल्या होत्या. आज मंत्रालयात पालकमंत्री राम शिंदे यांनी पुढाकार घेऊन ना. शेलार यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे स्पर्धा बंद पडल्या असून क्रीडा शिक्षक, वयोवृद्ध तसेच सर्वसामान्य नागरीकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे सांगितले.

जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी असून त्यांच्या कारभारामुळे शालेय खेळाडूंचे मोठे नुकसान होत असल्याने त्वरित कार्यवाही करण्याचे शिक्षण मंत्र्यांना बैठकीत सांगितले. त्यावर ना. शेलार यांनी तात्काळ क्रीडा सचिव राजेंद्र पवार यांना कार्यवाही करण्यास सांगून नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सांगितले. तसेच उच्चस्तरीय चौकशी नेमून कारवाई करत अहवाल मंत्रालयास पाठविण्याबाबत सांगून अहवाल प्राप्त होताच नगर येथून त्यांची बदली मोकळ्या असणाऱ्या जागेवर करण्या संदर्भातील निर्देश दिले.

अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत असेल किंवा खेळाडूंचे नुकसान होत असेल तर ते शासन कदापि सहन करणार नाही. स्पर्धा बंद असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशी मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात थारा मिळणार नाही.तर एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने चुकीच्या व्यक्तीची पाठराखण करणे हे चुकीचे असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच तालुका क्रीडाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर आलेल्या नावंदे यांची चौकशी करण्याबाबत पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळास आश्‍वासन दिले.

आज मंत्रालयात शालेय शिक्षणमंत्री यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड.अभय आगरकर, स्वप्निल देसाई, महापौर बाबासाहेब वाकळे, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, मुख्याध्यापक महासंघाचे सचिव बाळासाहेब कळसकर, राज्य संघटना कोषाध्यक्ष घनश्‍याम सानप, महानगरचे अरविंद आचार्य, तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, भैय्या तोरडमल, तुषार पोटे आदी उपस्थित होते.

क्रीडा प्रशिक्षकाकडून वादाला फोडणी

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे नगरला हजर झाल्यानंतर त्यांनी क्रीडा विभागाला शिस्त लावण्यास सुरवात केली. त्यातून अनेक संघटना व क्रीडा शिक्षक यांच्यात वाद झाले. त्याचा फायदा घेवून क्रीडा कार्यालयातील क्रीडा प्रशिक्षकाने या वादाला चांगलीच फोडणी दिली. त्यामुळे नावंदे यांच्याविरोधात वातावरण निमिर्ती करण्यात त्याला यश आले. जिल्हा क्रीडा अधिकारी पदाच्या लालसेपोटी क्रीडा प्रशिक्षकांकडून या वादात तेल ओतून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.