रांजणी – सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आणि मुलगी यांच्यात फुलत जाणाऱ्या प्रेमाच्या नात्याची कथा असलेला रॉम कॉम हा मराठी चित्रपट शुक्रवारी राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सुमारे 150 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी तरूणांचा मोठ्या प्रमाणावर उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.
शुक्रवारी पुणे शहराच्या सिंहगड रस्त्यावरील फन टाईम या चित्रपटगृहात रॉम कॉम चित्रपटाचा प्रिमियर शो सर्व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचे निर्माते संदीप बांगर यांच्यासह दिग्दर्शक तसेच कलाकार विजय गिते, मधुरा वैद्य, फकीरा वाघ आणि चित्रपटातील टिम यावेळी उपस्थित होती.
शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते चार दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी रॉम कॉम या चिटपटाचे प्रमोशन झाले होते. त्यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर आणि चित्रपटातील सर्व तंत्रज्ञ, दिग्दर्शक, कलाकार आदी मंडळी याप्रसंगी उपस्थित होते.
खरेतर मराठी चित्रपटांना प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना सिनेमागृह उपलब्ध होत नाहीत, परंतु रॉम कॉम सारख्या मराठी चित्रपटाला इतक्या मोठ्या संख्येने चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सिनेमागृह उपलब्ध झाली ही विशेष बाब आहे. चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी तरूणांनी रॉम कॉम ला चांगल्या प्रकारे पसंती दिली.
आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध मराठी उद्योजक संदीप बाळकृष्ण बांगर प्रस्तुत ड्रिम लॉन्चर इंटरटेन्मेंट निर्मित रॉम कॉम या चित्रपटातील कलाकारांची भाषा मराठवाड्यातील असून मराठवाडा भाषेतील या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला दाद द्यावी लागेल. रॉम कॉम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी राज्यातील, विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चित्रपटातील डायलॉगसह संवाद साधला होता. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातील प्रमुख गाण्यांवर ताल धरत कलाकारांबरोबरच विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
रॉम कॉम चित्रपटाचे निर्माते संदीप बांगर हे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील रहिवासी असून प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी चित्रपट निर्मितीत पहिल्यांदाच पाऊल टाकल्यने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात सामाजिक विषय असलेल्या चित्रपटांची निर्मिती करणार
असल्याचे बांगर यांनी यावेळी सांगितले.