राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम रखडलेलेच
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा घोळ अजून मिटलेला नाही. सल्लागार नियुक्तीबाबत बैठकांमध्ये केवळ चर्चा करण्याचे सत्र सुरू आहे. सल्लागार नियुक्तीवर एकमत होत नसल्याचे उघड झाले आहे.
परीक्षा परिषदेची स्वत:च्या मालकीची एक एकर जागा आहे. सध्याचे कार्यालय खूप जुने झालेले आहे. कार्यालयाच्या डागडुजीसाठी खर्च करुन कारभार सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), शासकीय संगणक टायपिंग व टंकलेखन प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती, विभागीय परीक्षा, डी.एल.एड., एनएमएमएस, एनटीएस, आरआयएमसी, एनएमएमएस यांसारख्या विविध परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा शुल्कांच्या माध्यमातून परीक्षा परिषदेकडे 210 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. या ठेवी विविध बॅंकामध्ये ठेवण्यात आल्या असून त्यातून मिळणाऱ्या व्याजातूनच सर्व खर्च भागवण्यात येत आहेत. त्यामुळे ठेवींमध्ये वाढच होत चाललेली आहे.
नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यासाठी 70 कोटी रुपये खर्च करण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे. त्यावर अनेकदा बैठका झालेल्या आहेत. त्यावर चर्चाही झाली आहे. नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी आराखडा तयार करणे, बांधकामासाठी निविदा मागविणे, देखरेख ठेवणे आदी कामासाठी सल्लागार नेण्याचा निर्णय जानेवारीत घेण्यात आला होता. यासाठी 2 कोटी रुपये खर्चाचे नियोजनही करण्यात आले. यासाठी दोन वेळा निविदा मागवण्यात आल्या. यात एकूण आठ ठेकेदारांनी निविदा दाखल केल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग व अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांमार्फत निविदातील कागदपत्रांची छाननी करण्यात आली. नुकतीच परिषदेत पुन्हा दिवसभर बैठक झाली. यात निविदांसाठी निकष ठरवून गुणदान करण्यात आले. मात्र, अखेर सल्लागार नियुक्तीवर तोडगाच निघालेला नाही. यामुळे इमारत बांधणीचा विषय आता लांबणीवर पडला हे उघड झाले आहे.