शिक्रापूर (प्रतिनिधी) – शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चाकण रोड लगत जातेगाव खुर्द परिसरात एका हॉटेल शेजारून तीन वेगवेगळ्या टँकर मधून स्पीरिट रसायन काढून त्याची चोरून विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी तेथे छापा टाकत दोघांना ताब्यात घेत तीन टँकर, एक छोटा टेम्पो तसेच स्पीरिट रसायन जप्त केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे स्पीरिट चोरीचा हा डाव फसला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चाकण रोड लगत जातेगाव खुर्द परिसरातील न्यू पंजाबी खालसा हॉटेल जवळ काही इसम तीन टँकर मधून कोणतेतरी रसायन काढून ड्रम व क्यांड च्या सहाय्याने एका छोट्या टेम्पो मध्ये टाकत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांना मिळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस शिपाई अंबादास थोरे, होमगार्ड योगेश बदे, मनोहर पुंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता.
तेथे जि.जे ०६ ए यु ३५२६, जि.जे ०६ ए यु ८५२६, जि जे ०६ एक्स एक्स ६९२६ या क्रमांकाचे कोणत्यातरी रसायनांचे तीन टँकर तसेच एम एच १२ क्यू जि ०७२१ क्रमांकाचा एक छोटा हत्ती टेम्पो आढळून आले. यावेळी पोलिसांना पाहून तेथील इसम पळून जाऊ लागले यावेळी पोलिसांनी दोघांना पकडले त्यावेळी त्याची नावे विचारली असता उमेश मोरे व सुरेंदरसिंग बोपाराये अशी नावे सांगितली त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी समाधान कारक उत्तरे दिली नाही.
तर तेथील व्यक्तींनी त्या तीन टँकर मधून दोनशे लिटरचे पाच ड्रम आणि पस्तीस लिटरचे सात क्यांड असे सुमारे एक हजार दोनशे पंचेचाळीस लिटर रसायन काढून त्यांच्याजवळील छोट्या टेम्पो मध्ये टाकले असल्याचे दिसून आले. यांनतर पोलिसांनी सदर रसायनांची चौकशी केली असता ते स्पीरिट नावाचे रसायन असल्याचे आढळून आले असून सदर वाहनांवरील चालक ते रसायन त्यांच्या ताब्यातील वाहनातून अपहार करत चोरून दुसऱ्यांना विक्री करणार असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई अंबादास अश्रुबा थोरे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी उमेश बबन मोरे वय २६ वर्षे रा. नारी ता. बार्शी जि सोलापूर व सुरेंदरसिंग ग्यानसिंग बोपाराये वय ४४ वर्षे रा. धल्ला पोस्ट कादिया ता. कटाला जि. गुरुदासपूर पंजाब तसेच इतर दोन अज्ञात टँकर चालक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत सुमारे सत्तेचाळीस लाख बासस्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचा ऐवज जप्त केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.