शिराळा (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक बँकेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे शिक्षक सभासदांमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षक बँकेत सत्ताधारी गटात खुशीचे वातावरण आहे तर विरोधी गटात नाराजीचा सूर आहे.
सांगली जिल्हा शिक्षक बँक ही नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. कधी वादळी वार्षिक सभा तर कधी कारभार यामुळे ही बँक कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे. सुमारे सात हजारपेक्षा जास्त सभासद असलेल्या या बँकेत नोकर भरती, संगणक दुरुस्ती खर्च यावरून या बँकेवर नेहमीच आरोप प्रत्यारोप होत असतात. सध्या या बँकेत सोलापूर जिल्ह्यातील सुमारे बाराशे सभासद केल्याने या बँकेच्या सत्तेचा निर्णय प्रथमच जिल्ह्याबाहेरील सभासद ठरवणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शिक्षक समितीची सत्ता आहे. बँकेच्या सत्ता बदलाचा इतिहास पाहता या बँकेत नेहमीच सत्तांतर होऊन दर पाच वर्षांनी कधी शिक्षक संघ तर कधी शिक्षक समिती अशी सत्ता राहिली आहे . माजी आमदार कै. शि. द. पाटील आणि शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्यात मतभेद होऊन शिक्षक संघात उभी फूट पडल्याचा फायदा शिक्षक समितीला झाला आणि बँकेच्या इतिहासात प्रथमच शिक्षक समिती सलग दहा वर्षे सत्तेत राहिली.
गत निवडणुकीत शिक्षक संघाच्या फुटीचा फायदा घेत शिक्षक समितीने संभाजीराव थोरात यांच्या शिक्षक संघाचा निसटता पराभव केला. यावेळी आमदार शि. द. पाटील यांचा शिक्षक संघ तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. या पराभवातून बोध घेत थोरात गटाचे जिल्हा अध्यक्ष विनायक शिंदे यांनी नव्या जोमाने संघटनेची पुनर्बांधणी केली. शिराळा, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव याबरोबरच जवळपास सर्वच तालुक्यांमधून कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत संघटनेची ताकद वाढवली. आमदार शि.द. पाटील यांच्या गटाने सुद्धा मोर्चेबांधणी केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळलेला सभासद शि.द.पाटील आणि थोरात गट यांचे मनोमिलन व्हावे यासाठी देव पाण्यात घालून बसला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या हालचाली पाहून शिक्षक समितीने सुद्धा ताकद वाढविण्याचा प्रयत्न म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सुमारे बाराशे सभासद वाढविले. बँकेचे कार्यक्षेत्र वाढल्याने आम्ही जिल्हा बाहेरचे सभासद केले असे सत्ताधारी गटाचे म्हणणे आहे तर केवळ सत्तेच्या हव्यासापोटी आणि संघाची वाढती ताकद बघून सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बाहेर पळ काढला असा आरोप विरोधी गटाचे नेते करताना दिसत आहेत.
आज शिक्षक बँकेची थकबाकी मोठी आहे. पगाराच्या अगोदर वसुली चेक जात असताना थकबाकी राहतेच कशी? असा प्रश्न सामान्य सभासदाला आहे.आज अखेर दोन अंकी लाभांश सभासदांना कधी मिळालाच नाही तर शिक्षक बँकेचा व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत नेहमीच जास्त राहिला आहे. असो काही असले तरी वाढता व्याजदर, घटता लाभांश, नोकर भरती आणि वारेमाप खर्च हे मुद्दे आगामी निवडणुकीत प्रमुख असणार आहेत. जिल्ह्याबाहेरचे सभासद हा कळीचा मुद्दा राहणार आहे. सांगलीच्या बँकेचा निर्णय जिल्ह्यातील नव्हे तर जिल्हा बाहेरच्या सभासदांच्या हातात गेला आहे.हा ही भाग महत्वाचा आहे. सध्या निवडणुकीच्या पूर्वतयारीची तालीम सुरु झाली होती. विभागवार बैठकांनी जोर धरला होता. वाढदिवस शुभेच्छा, सत्कारांना ऊत आला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवणुका पुढे ढकलल्यामुळे आता ही मंडळी थंडावली आहे. आता पुन्हा नव्याने निवडणुकीसाठी होणाऱ्या प्रोग्रॅमची प्रतीक्षा शिक्षकांना लागली आहे.